पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीदिनी १४ नोव्हेंबर १९७१ रोजी ८ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी ’किशोर’ हे मासिक बालभारतीच्या वतीने सुरू करण्यात आले. मुलांमध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी, अभ्यासक्रमाबाहेरचे ज्ञान मिळावे, त्यांच्या संवेदनशील मनावर उत्तम मूल्यांचे संस्कार व्हावेत ही उद्दिष्टे ठेवून किशोर मासिक चालवले जाते. गेल्या ४५ वर्षांत किशोर मासिकाने अनेक पिढ्यांवर वाचनाचे ज्ञान-विज्ञानाचे व मूल्यांचे संस्कार केले आहेत. अनेक चित्रकार, कवी लेखक यांना मासिकाने घडवले आहे.
त्या काळात दहा ते पंधरा वयोगटातल्या मुलांचं मनोरंजन करेल असं मासिक उपलब्ध नव्हतं. मुलांसाठीची महत्त्वाची नियतकालिकं काळाच्या पडद्याआड लुप्त झाली होती. पाठ्यपुस्तकांइतकंच विद्यार्थ्यांना पूरक वाचन साहित्य देणं गरजेचं होतं. पूरक वाचनासाठी पुस्तकं प्रसिद्ध करण्यात अनेक मर्यादा होत्या. मासिकाद्वारे हा उद्देश साध्य करणं शक्य होतं. त्यातून ‘किशोर’ची निर्मिती झाली.